ड्रॅगनला आयसिसचे खुले आव्हान! चिनी रेस्टॉरंट उडवले

Foto
काबूल : अफगाणिस्तानची राजधानी काबूलमध्ये एका चिनी रेस्टॉरंटमध्ये झालेल्या भीषण स्फोटाने संपूर्ण जग हादरले आहे. या आत्मघाती हल्ल्याची जबाबदारी कुख्यात दहशतवादी संघटना 'इस्लामिक स्टेट'ने स्वीकारली असून, त्यांनी प्रथमच चीनला थेट लक्ष्य केले आहे. चीनमधील उइघुर मुस्लिमांवर होणाऱ्या अत्याचाराचा बदला घेण्यासाठी हा हल्ला केल्याचा खळबळजनक दावा आयसिसने केला आहे.

नेमकं काय घडलं?

काबूलमधील 'शहर-ए-नाव' या गजबजलेल्या भागात असलेल्या एका चिनी रेस्टॉरंटच्या किचनमध्ये हा भीषण स्फोट झाला. या हल्ल्यात एका चिनी नागरिकासह किमान ७ जणांचा मृत्यू झाला आहे, तर आयसिसच्या दाव्यानुसार मृतांचा आणि जखमींचा आकडा २५च्या वर आहे. एका इटालियन चॅरिटी संस्थेने दिलेल्या माहितीनुसार, त्यांनी २० मृतदेह रुग्णालयात पाठवले आहेत. या रेस्टॉरंटचे मालक अफगाणी नागरिक असले तरी, त्यात एक चिनी नागरिक आणि त्याची पत्नी भागीदार होते.

हल्ल्याचे कारण काय?

आयसिसने आपली वृत्तसंस्था 'अमाक'च्या माध्यमातून या हल्ल्याचे कारण स्पष्ट केले आहे. "चीनमध्ये उइघुर मुस्लिमांवर अमानुष अत्याचार केले जात आहेत. या अत्याचारांना प्रत्युत्तर म्हणून आम्ही चिनी नागरिकांना लक्ष्य केले आहे," असे संघटनेने म्हटले आहे. या हल्ल्यात तालिबानचे काही कमांडरही मारले गेल्याचा दावा आयसिसने केला आहे, मात्र तालिबानने अद्याप याला अधिकृत दुजोरा दिलेला नाही.

चीनची धाकधूक वाढली

२०२१ मध्ये तालिबान सत्तेवर आल्यानंतर बहुतेक देशांनी अफगाणिस्तान सोडला, पण चीनने आपले आर्थिक प्रकल्प तिथे सुरूच ठेवले आहेत. आता आयसिसने उइघुर मुस्लिमांच्या नावाखाली चीनला दिलेली ही धमकी बीजिंगसाठी मोठी डोकेदुखी ठरणार आहे. पाकिस्तानातही चिनी इंजिनिअर्सवर सतत हल्ले होत असताना, आता अफगाणिस्तानातही चिनी नागरिक सुरक्षित नसल्याचे या घटनेने सिद्ध केले आहे.

तालिबानची कोंडी

तालिबानचे प्रवक्ते मुफ्ती अब्दुल मतीन कानी यांनी सांगितले की, या स्फोटाचा तपास सुरू आहे. विशेष म्हणजे, तालिबानने अद्याप याला दहशतवादी हल्ला म्हणणे टाळले आहे. मात्र, आयसिसच्या या खुल्या आव्हानामुळे अफगाणिस्तानच्या सुरक्षेवर आणि तालिबानच्या प्रशासनावर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.